मा. प्राचार्य मनोगत

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक घडविणारे महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्यु., सातारा हे महाराष्ट्रातील पहिले खाजगी संस्थेचे अध्यापक विद्यालय सुरु करून शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल टाकले, या घटनेस ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्थेची पहिली शाखा म्हणून या अध्यापक विद्यालयाचे स्थान निश्चितच वेगळे आहे. १७ जुलै २००९ ते १६ जुलै २०१० या कालावधीत या अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव संस्था व अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त सहभागाने भव्य प्रमाणात साजरा केला.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विजयादशमी दिनी शनिवार दि. ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी कराड तालुक्यातील काले या खेडेगावी एका वस्तीगृहाने 'रयत शिक्षण संस्थेची' स्थापना केली. पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बहुजन समाजासाठी ग्रामीण परिसरात ५७८ व्हालंटरी स्कूल्स सुरु करून शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल टाकले. प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची आवश्यकता कर्मवीरांनी प्रथम ओळखली. सातारा तालुक्यातील अंगापूर येथे सन १९२१ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात कर्मवीर म्हणाले "प्राथमिक शाळेशिवाय गाव असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाशिवाय शाळा असू नये." ' त्यांनी या प्रसंगी ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्याचा महोदय व्यक्त केला होता. पुढे जॉर्ज पंचम बादशाहाच्या राज्यारोहणाच्या सिल्व्हर ज्युबिली 'वर्षी १७ जुलै १९३५ रोजी' सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरु केले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याचे "महात्मा फुले अध्यापक विद्यालय" असे नामांतर करण्यात आले. अशा प्रकारे कर्मवीरांनी आध्य समाजसुधारक व कर्मवीरांची वैचारिक बैठक निर्माण करणारे त्यांचे गुरु महात्मा फुले यांचे महाराष्ट्रातील व देशातील पहिले चिरंतन स्मारक उभारले. सन १९६० नंतर हे अध्यापक विद्यालय चार भिंतीवरील आजच्या भव्य वास्तूत स्थिरावले आहे. आज या अध्यापक विद्यालयाच्या शैक्षणिक आकृतीबंधातील परिवर्तनानुसार महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन असा नावात बदल झालेला आहे. आज अखेर या अध्यापक विद्यालयामधून औपचारिक व अनौपचारिक असे अनेक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमालीच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अध्यापक विद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य सततच लाभले आहे. तसेच संस्थेचे असंख्य कार्यकर्ते, संस्था हितचिंतक, आजी माजी सेवक व छात्राध्यापक, जाहिरातदार, देणगीदार, ज्ञात व अज्ञात व्यक्ती यांच्या भरीव सहकार्यामुळेच अध्यापक विद्यालय उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

या अध्यापक विद्यालयाची प्रगती असीच उत्तरोत्तर वाढत जावो, संस्थेच्या नावलौकिकात भर पडो अशी कर्मवीर चरणी प्रार्थना. जय कर्मवीर.



प्राचार्य उदयकुमार अरुण सांगळे
महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा.